जेएनएन, मुंबई: महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, त्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने पोलिसांकडून त्याला न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

तपास यंत्रणांकडून खरातचा पाचव्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात नवीन अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत सरकारी पक्ष नेमकी काय भूमिका मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शुक्रवारी खरातच्या कार्यालयावर प्रवर्तन संचालनालय (ED) आणि विशेष तपास पथक (SIT) यांनी संयुक्त छापा टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. या कारवाईमुळे तपासाला वेग आला असून, आर्थिक गैरव्यवहार आणि इतर बाबींचाही तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीत तपास यंत्रणा अधिक कोठडीची मागणी करते का, तसेच न्यायालय त्यावर काय निर्णय देते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पुढील काही दिवसांत तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Ashok Kharat: अशोक खरातचा आता ED आणि IT ने फास आवळला; घरात सापडले 10 कोटींच्या मालमत्तेचे धागेदोरे! बेनामी व्यवहारांच्या 'कच्च्या नोंदी'