जेएनएन, नागपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार, 21 जानेवारी 2026 रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) जामठा स्टेडियमवर होणाऱ्या टी-20 क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी महा मेट्रोतर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. सामन्याच्या दिवशी मेट्रो ट्रेन सेवा रात्री 10 वाजत्यानंतरही वाढवून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा, तसेच गरज भासल्यास त्यानंतरही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात आज मेट्रो भवन येथे महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बडकस यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. बैठकीत सामन्याच्या दिवशी प्रवाशांचा सुरक्षित, सुलभ आणि जलद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी खापरी मेट्रो स्टेशन ते जामठा स्टेडियम या मार्गावर नागपूर महानगरपालिकेच्या बसेस फिडर सेवा म्हणून उपलब्ध राहणार आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सामन्याच्या दिवशी शेवटची मेट्रो ट्रेन खापरी मेट्रो स्टेशनवरून मध्यरात्री १२ वाजता सुटेल. मात्र, गरजेनुसार त्यानंतरही मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
खापरी येथून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपर्यंत थेट प्रवास करू शकतील किंवा सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलून अॅक्वा लाईनवरील कोणत्याही दिशेने प्रवास करता येईल. सामन्याच्या दिवशी मेट्रो गाड्या दर 10 मिनिटांच्या अंतराने धावणार आहेत.
व्हीसीए जामठा स्टेडियम हे न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून सुमारे 7 किमी आणि खापरी मेट्रो स्टेशनपासून सुमारे 6 किमी अंतरावर आहे. स्टेडियमकडे जाण्यासाठी तसेच सामन्यानंतर परतीसाठी न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून नागपूर महानगरपालिकेच्या बसेस (शुल्क आकारून) उपलब्ध असतील.
सामन्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी महा मेट्रो सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महा मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा: पिढीगत संक्रमणाबाबत नितीन गडकरींचे वक्तव्य: ‘पुढील पिढीने पुढे यावं, जुनी पिढी योग्य वेळी मागे हटली पाहिजे’
