जेएनएन,नाशिक/ नागपूर: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा राज्यात वेगाने पसरत आहे. त्याचा परिणाम म्हणून येवला आणि नागपूर येथे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र समोर आले आहे.
येवला शहरात मध्यरात्रीच नागरिकांची धाव
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे “पेट्रोल बंद होणार” असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास अनेक नागरिक झोपेतून उठून आपल्या वाहनांसह पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही पंपांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी पेट्रोल संपल्याच्या तक्रारीही समोर आले आहे.
नागपुरातही तसंच चित्र
नागपूर शहरातही अशाच अफवांमुळे रात्री उशिरा पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लांबपर्यंत पसरल्याचे दिसून आले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही पंपांवर इंधन साठा तात्पुरता संपल्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, ही टंचाई वास्तविक नसून, नागरिकांच्या घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यामुळे निर्माण झालेली असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय पातळीवर स्पष्टता – टंचाई नाही
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने पत्रकार परिषदेत देशात कुठेही इंधन टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाचे आवाहन
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना वारंवार आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी टाळावी, तसेच शांतता राखून आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. कुणाच्या मनात जर भीती असेल तर त्यांनी मनातून काढून टाकावी. जिल्ह्यात कुठलीही पॅनिक स्थिती नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी सांगितले.
अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई
पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर उर्जेबाबत केंद्र शासन तसेच राज्य सरकारकडूनही यापूर्वीच स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध अत्यावश्यक बाबींच्या सनियंत्रणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. अत्यावश्यक सेवेबाबत चुकीच्या अफवा पसरविणाऱ्यांबद्दल अथवा यात अडथळा आणणा-यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा: खुशखबर! देशातील एलपीजी संकट संपणार; गॅसने भरलेली दोन जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या दिशेने रवाना
