जेएनएन, नागपूर: जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) स्टेडियमवर आज भारत–न्यूझीलंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामना रंगणार असून, मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन आखले आहे. या नियोजनानुसार वाहनांच्या ये–जा मार्गांसह पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठराविक मार्गानेच स्टेडियमकडे प्रवास
नागपुरातून जामठा स्टेडियमकडे येणाऱ्या वाहनांनी वर्धा मार्गावरून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय)कडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याचा वापर करावा. एनसीआय मार्गावर पुढे गेल्यानंतर माऊली नगरीजवळ डावे वळण घेऊन, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पार्किंग कक्षांकडेच वाहने न्यावीत.
जामठा टी पॉईंटवरून स्टेडियम किंवा जामठा गावाकडे कोणत्याही सर्वसामान्य वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या मार्गाने केवळ खेळाडू व अंम्पायर यांच्या वाहनांना परवानगी राहणार आहे.
पार्किंगची स्वतंत्र व सुव्यवस्थित व्यवस्था
वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दुचाकी, चारचाकी, व्हीआयपी, स्कूल बस, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व पोलिसांसाठी स्वतंत्र पार्किंग कक्ष निश्चित करण्यात आले आहेत.
कक्ष ‘ए’ : फक्त व्हीआयपी, पोलिस व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी
कक्ष ‘बी’ : चारचाकी वाहने
कक्ष ‘सी’ (अन्विता फार्म) : दुचाकी वाहने
कक्ष ‘डी-१’ : एका बाजूला चारचाकी, दुसऱ्या बाजूला दुचाकी
कक्ष ‘डी-२’, ‘डी-३’, ‘डी-४’, ‘डी-५’ व ‘ई’ (अल्ट्राटेक) : चारचाकी वाहने
कक्ष ‘जी’ : फक्त व्हीसीए मेंबर्ससाठी
कक्ष ‘एच’ : केवळ स्कूल बससाठी
कक्ष ‘आय’ : राखीव पार्किंग
वर्धा–बुटीबोरी मार्गाने येणाऱ्यांसाठी वेगळी सोय
वर्धा व बुटीबोरी मार्गाने जामठ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कक्ष ‘एफ’ (ब्रह्मकुमारी) येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे एका बाजूला दुचाकी तर दुसऱ्या बाजूला चारचाकी वाहने पार्क करता येणार असून, येथून स्टेडियमपर्यंत फिडर बस सेवा उपलब्ध राहणार आहे.
स्कूल बस व सदस्यांसाठी सूचना
स्कूल बस वाहनांनी एनसीआयच्या समोरून युटर्न घेऊन गेट क्रमांक 13 समोरील पार्किंग कक्षात वाहने उभी करावीत. व्हीसीए सदस्यांची वाहनेही याच पद्धतीने प्रवेश घेणार आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
सामन्याच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर मर्यादित ठेवावा, शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक व फिडर बसचा वापर करावा, तसेच पोलिस व स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे. नियोजित मार्ग व पार्किंग कक्षांचा वापर केल्यास कोणताही त्रास न होता सामना पाहण्याचा आनंद घेता येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
