जेएनएन, नागपूर: शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने 18 एप्रिल 2026 रोजी नागपूर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उद्या (शनिवार, 18 एप्रिल) सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी पिणे, तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Update: देशात उष्णतेची लाट; पुढचे 24 तास महत्त्वाचे; महाराष्ट्रातील 25+ जिल्ह्यांत पारा 40 पार! सतर्कतेचे आवाहन
