जेएनएन, अकोला: अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीच्या उमेदवार शारदा खेडकर यांनी बाजी मारली आहे. शारदा खेडकर यांनी एकूण 45 मते मिळवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 13 मतांनी पराभव केला.

या निवडणुकीत सुरेखा काळे यांना 32 मते मिळाली. विशेष म्हणजे एमआयएमचे ३ नगरसेवक तटस्थ राहिल्याने मतदानाच्या गणितावर त्याचा थेट परिणाम झाला. एकूण मतदान शांततेत पार पडले.

भाजपप्रणीत आघाडीचा वरचष्मा
महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीपासूनच भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीचा वरचष्मा दिसून येत होता. संख्याबळाच्या जोरावर शारदा खेडकर यांचा विजय अपेक्षित मानला जात होता, मात्र त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली पकड अधिक मजबूत केली आहे.

विजयाबद्दल आनंदोत्सव
निकाल जाहीर होताच भाजप व शहर सुधार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित महापौर शारदा खेडकर यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

काय म्हणाल्या शारदा खेडकर?
विजयानंतर प्रतिक्रिया देताना शारदा खेडकर म्हणाल्या की “अकोला शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल.”

आगामी काळात आव्हाने
अकोला शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज आणि नागरी सुविधांचे प्रश्न हे नवनिर्वाचित महापौरांसमोर मोठे आव्हान असणार आहेत. मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्याने निर्णय प्रक्रिया वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    शारदा खेडकर यांच्या विजयामुळे अकोला महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा भाजपप्रणीत आघाडीच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

    हेही वाचा: ठाणे मनपात भाजप विरोधी बाकावर बसणार? महायुतीत सत्तेचा तिढा, महापौरपदावरून शिवसेना–भाजपमध्ये मतभेद