जेएनएन, मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे.आता त्या परीक्षा 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत.

मुळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा नियोजनात बदल करण्यात आला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या तारखा बदलले आहे.

निवडणूक कार्यक्रमात झालेल्या या बदलांचा परिणाम विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकावरही झाला आहे. आधी मुंबई विद्यापीठाने 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र आता पुन्हा एकदा या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काही विद्यार्थ्यांनी परीक्षांसाठी तयारीस अधिक वेळ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे, तर काहींनी वारंवार होणाऱ्या बदलांमुळे गोंधळ निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांना नव्या तारखांनुसार तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: ZP Election:जिल्हा परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात; आजपासून दिग्गज नेत्यांच्या सभांना सुरुवात