जेएनएन, ठाणे: एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ‘कैसे हराया?’ या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या सहर शेख सध्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत आल्या असून त्या ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंब्रा भागातून ठाणे महानगरपालिकेवर निवडून आलेल्या सहर शेख यांच्याविरोधात निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली असून कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचे समजते. प्राथमिक तपासात ओबीसी प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान, प्रकरण तापत असतानाच सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख हे दोघेही संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांशी संपर्क टाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणे यामुळे या प्रकरणात अधिकच संशय निर्माण झाला आहे.
याच दरम्यान, सहर शेख ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्यांचा वानखेडे स्टेडियम येथे आयपीएल सामना पाहतानाचा व्हिडिओ समोर आल्याने वाद आणखी चिघळला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
