जेएनएन, मुंबई: मागील 48 तासांपासून देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला असतानाच, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट होत आहे. या बदलांचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येत असून, राज्यात तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. परिणामी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा वाढत असून त्याचबरोबर पावसाळी वातावरणाची चाहूल लागली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात पुढील 24 तासांत सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
सध्या केरळच्या किनारपट्टी भागांमध्ये अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत आहे. या हवामान प्रक्रियेचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत असून, राज्यात अचानक ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग वाढणे आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, या बदलत्या हवामानामुळे शेतकरी, प्रवासी तसेच नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता मोकळ्या मैदानात जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: Mumbai University: निवडणूक कार्यक्रमातील बदलाचा परिणाम; मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या परीक्षा
