जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात अखेर शिवसेना–भाजप युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र युतीची घोषणा होताच अवघ्या काही वेळातच भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राडा घातल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
युतीबाबत बैठक ज्या हॉटेलमध्ये सुरू होती, त्याच ठिकाणी वैजापूर तालुक्यातील काही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “युती आम्हाला नको” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. “जर सिल्लोडमध्ये युती होत नसेल, तर वैजापूरमध्येच का? सिल्लोडप्रमाणेच वैजापूरलाही न्याय द्या,” अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.
अतुल सावे यांचा घेराव, पोलिसांनी केली सुटका
या आंदोलनादरम्यान भाजप नेते अतुल सावे यांची गाडी अडवून कार्यकर्ते थेट रस्त्यावर आडवे बसले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अतुल सावे यांची कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सुटका केली. त्यानंतर सावे त्या ठिकाणाहून निघून गेले.
युती झाली, तरी सत्तारांच्या भूमिकेने तणाव कायम
धक्कादायक बाब म्हणजे युतीची घोषणा झाली असली तरी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेमुळे युतीत तणाव निर्माण झाला असता.अब्दुल सत्तार यांनी कोणाशीही चर्चा न करता “आम्ही सिल्लोडमध्ये वेगळे लढणार” अशी घोषणा केली आहे. “सिल्लोडमध्ये भाजपची ताकद नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार,” असे सत्तार यांनी जाहीर केले आहे.
अतुल सावे यांचा सत्तारांवर टोला
या पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला.“ते मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत, पालकमंत्र्यांनी बोलावले तरी येत नाहीत, मग त्यांच्याशी चर्चा तरी कशाला करायची?” असे म्हणत सावे यांनी सत्तारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्ह्यात राजकीय समीकरणे तापली
युतीची घोषणा होऊनही कार्यकर्त्यांचा रोष, नेत्यांमधील मतभेद आणि सत्तारांची बंडखोर भूमिका यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप–शिवसेना युती टिकणार की अधिक तणाव वाढणार,
याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
