जेएनएन, छत्रपती संभाजी नगर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठल्याही पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा झालेल्या नव्हत्या. मात्र आजपासून या प्रचाराला वेग मिळणार असून, राज्यातील दिग्गज नेते थेट मैदानात उतरल्याने रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेमुळे शिवसेना आणि महायुतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेकडे स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागले असून, मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसभरात पाचपेक्षा अधिक जाहीर सभा घेणार आहेत. ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव लक्षात घेता, भाजपकडून प्रचारात आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विविध तालुक्यांमध्ये पंकजा मुंडे थेट मतदारांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर भर देणार असल्याची माहिती आहे.

याशिवाय, उद्यापासून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचार सभांचा धडाका लावणार आहेत. सलग सभा, बैठका आणि कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचाराची धार अधिक तीव्र केली जाणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रमुख पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला वेग आला आहे. पुढील काही दिवसांत सभा, रॅली आणि प्रचार फेऱ्यांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics: ‘एवढ्या वेळा पायलट का बदलले?’ अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरीनं व्यक्त केली शंका