जेएनएन, अमरावती: महापालिकेच्या महापौर निवडणुकीदरम्यान मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. एमआयएम पक्षाच्या एका नगरसेवकाने पक्षाने बजावलेला व्हिप मोडत थेट भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमआयएम पक्षाने संबंधित नगरसेवकावर तात्काळ कारवाई करत त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
अमरावती महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौर पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष महापौर निवडणुकीकडे लागले होते. या निवडणुकीत एमआयएमचे एकूण 12 नगरसेवक निर्णायक भूमिका बजावतील, अशी चर्चा होती. त्यामुळे एमआयएम पक्षाने आपल्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याचा व्हिप बजावला होता.
मात्र, एमआयएमच्या एका नगरसेवकाने पक्षाच्या भूमिकेला धुडकावून महापौर पदासाठी भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने मतदान केलं.इतकंच नव्हे तर संबंधित नगरसेवकाने उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेडे यांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे एमआयएम पक्षाची कोंडी झाली असून पक्षशिस्तीचा भंग झाल्याचा ठपका ठेवत संबंधित नगरसेवकावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. एमआयएमच्या नेतृत्वाने तात्काळ निर्णय घेत त्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अमरावती महापालिकेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, महापौर आणि उपमहापौर निवडणुकांमध्ये पडद्यामागील घडामोडींना वेग आला आहे. व्हिप मोडून केलेल्या मतदानामुळे एमआयएमला आगामी काळात आणखी मोठे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: ZP Election 2026: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना उत्स्फूर्त प्रतिसाद; काही ठिकाणी नियमभंग उघड
