जेएनएन, मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहारमधील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी पात्र आणि इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 मे 2026 आहे. मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी हे आवाहन केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शासन निर्णयातील इतर अटी व शर्तीही लागू राहणार आहेत. लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यात्रेदरम्यान प्रवास, निवास आणि भोजनाची सुविधा शासनाच्या नियमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच यात्रेत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, 75 वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एका व्यक्तीस सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अपूर्ण अथवा अपात्र अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जामध्ये खोटी माहिती आढळल्यास अर्ज तत्काळ रद्द करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज वेळेत सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
