जेएनएन, पुणे: फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची हॉल तिकीट 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत आदेश जारी केले आहेत.
राज्यातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in वरून डाऊनलोड करून घ्यावीत व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का मारून विद्यार्थ्यांना वितरित करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर त्यावरील विद्यार्थ्यांचे नाव, आईचे नाव, विषय, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक आदी तपशील काळजीपूर्वक तपासण्याच्या सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. काही त्रुटी आढळल्यास तातडीने संबंधित विभागीय मंडळाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट मिळाल्यानंतर त्यावरील सर्व माहिती स्वतः तपासून पाहावी. कोणतीही चूक असल्यास त्वरित शाळेकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. परीक्षेच्या दिवशी हॉल तिकीट सोबत असणे अनिवार्य असून, त्याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी बसणार असून, ऑनलाईन पद्धतीमुळे हॉल तिकीट वितरण प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होणार आहे.
हेही वाचा: Maharashtra Apprentice 2026: अप्रेंटिसशिप 600 पदांसाठी नोंदणी सुरू, प्रशिक्षण आणि स्टायपेंड मिळविण्याची संधी, येथे करा अर्ज
