छत्रपती संभाजीनगर. भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या अपघाती निधनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या कारने संभाजीनगरहून शिर्डीला प्रवास करत असताना समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या वाहनाची पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, कार थेट कंटेनरखाली घुसली. या अपघातात शेळके गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रयत्नानंतर शेळके यांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात अतिवेग तसेच कंटेनर रस्त्यावर उभा असणे ही कारणे समोर येत आहेत.
जितेंद्र शेळके हे महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते.
