नवी दिल्ली: कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात शुक्रवारी एका खासगी बससोबत समोरासमोर धडक झाल्याने कारला आग लागली, या भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा जिंवत होरपळून मृत्यू झाला.

गाडीतील सहा जण जिवंत जळाले, तर स्थानिकांनी वाहनातून इतर दोघांना वाचवले. ते गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरपूर तालुक्यात देवपूरजवळ घडली. प्राथमिक अहवालानुसार, यादगीरहून रायचूरकडे जाणाऱ्या कारची बंगळूरुहून कलबुर्गीकडे येणाऱ्या एका खासगी बसशी धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार आणि बस या दोन्ही वाहनांना आग लागली.

बस झाली जळून खाक-

कार व बसला पूर्णपणे आग लागली, त्यात यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुरपूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.

अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे नेमके कारण निश्चित केलेले नाही. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. कारसोबतच, धडकेनंतर बसलाही आग लागली.

    असा अपघात यापूर्वीही झाला आहे-

    25 डिसेंबर 2025 रोजी, कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ बंगळूरुहून गोकर्णकडे जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर बसला ट्रकची धडक बसल्याने आग लागली, या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला.

    राष्ट्रीय महामार्ग 48  वर पहाटे 2:30 च्या सुमारास झालेल्या या अपघातात किमान सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 28 जण जखमी झाले. मृतांमध्ये बिंदू व्ही., त्यांची मुलगी ग्रेमा, मानसा, नव्या आणि रश्मी महाले यांचा समावेश होता, जे बंगळूरुहून गोकर्णकडे देवदर्शनाला जात होते. खासगी बस चालकही या अपघातात मृत्यू झाला जो उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे.