मुंबई - पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून खासदार फुटीच्या चर्चा रंगल्या होत्या. चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.  उद्धव ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांनी आज आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला स्वतंत्र मान्यता दिल्याची माहिती समोर येत आहे. हा उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात असून, अध्यक्ष कार्यालयाकडून गटाला मान्यता मिळाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

माहितीनुसार, या खासदारांचा कल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभेतही शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2022 मध्ये राज्यात झालेल्या शिवसेना फुटीनंतर विधानसभा स्तरावर मोठा बदल झाला होता. आता त्याचाच परिणाम संसदीय राजकारणातही दिसून येणार आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांनंतर पक्ष संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खासदारांची संभाव्य गळती हा ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

दुसरीकडे, शिंदे गटाकडून मात्र याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तर ठाकरे गटातील नेत्यांनीही या वृत्तांवर सावध भूमिका घेतली असून, अधिकृत निर्णय किंवा आदेश समोर आल्यानंतरच भूमिका स्पष्ट केली जाईल, असे संकेत दिले आहेत.