मुंबई. Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बड्या नेत्यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरु आहे. एकूण 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान पार पडणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल.
संख्याबळानुसार जागांचे चित्र-
विधानसभेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. अंदाजे समीकरणानुसार:
* भाजप : 5 जागा
* शिवसेना (शिंदे गट) : 2 जागा
* राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 1 जागा
* महाविकास आघाडी : 1 जागा
यामुळे महाविकास आघाडीला मिळणाऱ्या एका जागेसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.
काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी-
महाविकास आघाडीतील ही एकमेव जागा कोणाला मिळणार यावर काँग्रेसमध्ये हालचाली वेगाने सुरू झाले आहेत. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, राजेश राठोड यांचे नाव अग्रेसर आहेत. या नावांमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून अंतिम उमेदवार ठरवताना पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान असणार आहे.
ठाकरे गटाकडूनही चर्चेला उधाण!
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) कडून उद्धव ठाकरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेत जाण्यास इच्छुक नसल्यास पर्यायी नावांवरही चर्चा सुरू आहे. राज्यसभेप्रमाणेच इथेही पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांना संधी देण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत ‘वन सीट’वर राजकारण!
महाविकास आघाडीला मिळणारी एकमेव जागा कोणत्या पक्षाला मिळणार यासाठी चढाओढ सुरू आहे. काँग्रेस, ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी (शरद पवार गट) यावर सध्या पडद्यामागे जोरदार चर्चा सुरू आहे. ही जागा प्रतिष्ठेची मानली जात असल्याने तिन्ही पक्षांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे.
