जेएनएन, मुंबई. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकभवनात एनसीपी नेत्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Sunetra Pawar oath ceremony) घेतली. राज्यपाल आचार्य दैवव्रत यांनी त्यांना मंत्री पदाची शपथ दिली.

सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

तसंच, रोहित पवार यांनी डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..! असंही म्हटलं आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले...

‘राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..!

डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!’ अशी पोस्ट रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर केली आहे.