जेएनएन, पुणे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गेट नंबर 4 वर ही घटना घडली असून कोयत्याचे वार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. चार ते पाच जणांकडून हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी या घटनेनंतर परिसर सील केला आहे.

शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक 4 जवळ गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. काही वेळापूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले.  

घटनास्थळी पोलिसांची धाव

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गोळीबारातून बचाव करण्यासाठी पीडित व्यक्तीने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती आहे. घटनेनंतर जखमीला तातडीने ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हल्ला झालेली व्यक्ती एका प्रकरणातील साक्षीदार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याशी या हल्ल्याचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास होण्याची शक्यता आहे. साक्षीदारावरच न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारे हल्ला झाल्याने न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.