जेएनएन, पुणे: पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. शहर भाजपकडून महापौरपदासाठी तीन नावांची शिफारस भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पुणे महापालिकेच्या आगामी सत्तास्थापनेचा आढावा घेण्यात आला.महापौरपदासाठी कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची, यावर सखोल चर्चा झाली. त्यानंतर मंजुषा नागपुरे, वर्षा तापकिर आणि मानसी देशपांडे या तीन महिला नगरसेवकांची नावं महापौरपदासाठी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहेत.
आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजप उमेदवारांचे अर्ज आज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिकेत भाजपची संख्या बल पाहता, महापौरपद भाजपकडे जाण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे.
तीन महिला नगरसेवकांमध्ये रस्सीखेच
महापौरपदासाठी सुचवण्यात आलेल्या तिन्ही नावांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तिन्ही नगरसेवकांचा महापालिकेतील अनुभव, पक्षसंघटनेतील कामगिरी आणि शहर पातळीवरील ओळख या निकषांवर प्रदेश पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत सध्या सस्पेन्स कायम आहे.
अंतिम निर्णय प्रदेश नेतृत्वाकडून
महापौरपदाचा उमेदवार प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात पुढील काही तासांत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.
