जेएनएन, पुणे. PMC Election News: पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता पूर्णतः मावळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माहिती दिली आहे.

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, असे जगतापांनी जाहीर केले.

शरद पवारांसोबत सविस्तर चर्चा  

प्रशांत जगताप आणि शरद पवार यांच्यात जवळपास तासाभराची बैठक झाली. या बैठकीत पुणे महानगरपालिकेतील राजकीय स्थिती आणि महाविकास आघाडीतून लढण्याचे फायदे-तोटे यावर सखोल चर्चा केली आहे.दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर तयार होणारा गोंधळ,संभाव्य जागावाटप यावर विस्तृत चर्चा झाली.

जगताप म्हणाले, शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की पुण्यात, पिंपरी-चिंचवडमध्ये आणि पुणे ग्रामीणमध्येही निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे. कुठेही दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रित प्रयोग होणार नाही. 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम

    गेल्या काही आठवड्यांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा काही भाग एकत्र दिसत होता. काही ठिकाणी स्थानिक निवडणुकांमध्ये संयुक्तरीत्या लढण्याचे संकेतही मिळत होते. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. 

    मात्र जगतापांनी काही दिवसांपूर्वीच कठोर भूमिका घेतली होती: “जर दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन.” आजच्या बैठकीनंतर या प्रश्नावर पूर्णविराम लागला असून जगतापांची भूमिका पक्षाध्यक्षांनी मान्य केली आहे.