बारामती/मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या चर्चांना आता वेग येत असतानाच, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठं विधान केलं आहे. “अजित पवार यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा अजित पवार यांनीच पुढे यावं, हीच सर्वांची भावना आहे,” असं झिरवाळ यांनी स्पष्ट केलं.
झिरवाळ म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता सुनेत्रा वहिनीच सांभाळतील, असा पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. अजितदादांच्या पावलावर पाऊल टाकत पक्ष मजबूत ठेवण्याची क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये आहे.”
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांबाबतही मोठं विधान केलं. “आता तुतारी आणि घड्याळ वेगळं नाही. दोन्ही एकच आहेत. आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत. इथून पुढेही त्या एकत्रच राहतील, यात कुठलीही शंका नाही,” असं झिरवाळ यांनी ठामपणे सांगितलं.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पक्षाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू असताना, नरहरी झिरवाळ यांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची शक्यता अधिक बळावली आहे.
सुनेत्रा पवार यांना पक्षाची धुरा दिली गेली, तर तो राष्ट्रवादीसाठी एक भावनिक आणि धोरणात्मक निर्णय ठरू शकतो. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली सहानुभूती, तसेच पक्षातील एकजुटीचा संदेश देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून, लवकरच पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नरहरी झिरवाळयांच्या वक्तव्यामुळे मात्र राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
