इश्वरपूर. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. शरद पवारांनंतर जयंत पाटील यांनीही अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांबाबत भाष्य केले आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या. दोन्ही गटाच्या अनेक बैठकाही पार पडल्या होत्या. सर्व काही ठरले होते. १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणाही होणार होती असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यास अजित पवार सरकारमध्ये राहणार होते का, या प्रश्नावर जयंत पाटलांनी मौन बाळगले.

जे झालं ते विसरून आपण एक होऊ -

अलीकडच्या काळात अजितदादा बऱ्याच वेळा माझ्या घरी आले होते. त्यांची माझी चर्चा झाली होती. बऱ्याच वेळेला ते संध्याकाळी येऊन जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे. त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत. जे माझ्या बद्दल जनमानसात आहे, ते पुसून मी पुन्हा साहेबांसोबत एकत्र यायला तयार आहे. त्यांचा आग्रह होता. एकदा नाही जवळपास 8 - 10 वेळा बैठका झाल्या. आणि बैठकीचे ठिकाण माझं घरच होतं. पहिल्या दोन चार बैठका तर त्यांनी त्यांच्या भावनाच व्यक्त केल्या. त्यांना साहेबांबद्दल प्रचंड आदर होता. जे झालं ते विसरून आपण एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ करू, ही त्यांची अंतिम फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती.  

12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा -

16 तारखेला माझ्या घरीच पक्षातील काही प्रमुख नेत्यांसह त्यांची बैठक झाली. यापूर्वी देखील अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, पक्षांच्या अध्यक्षांसह बैठक झाली. 16 ला सगळेच एकत्र होतो. त्यात ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढू. निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटील ठरवतील ती तारीख जाहीर करू असे ते म्हणाले. आम्ही 12 तारीख आम्ही निश्चित केली.  

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही सहज गमतीत म्हटले की, आपण बारामतीला शरद पवार साहेबांना भेटायला विमानाने जाऊ. आम्ही ज्याला फोन केला तो म्हणाला की ती धावपट्टी लहान आहे, माझे विमान काही तिथे उतरणार नाही. मग आम्ही गाडीने निघालो आणि सकाळी आठ वाजता पवार साहेबांच्या समोर बसलो. तिथे सविस्तर चर्चा झाली. 12 तारीख आम्ही सर्वांनी निश्चित केली.

    सत्तेत जाणार होता का?

    दोन्ही पक्ष एकत्र यावे हा त्यांचा आग्रह होता त्यातील बरेच तपशील आहेत. पुढे त्याचाही खुलासा मी करेन. काही वेळा सुप्रिया ताई देखील उपस्थित असायच्या. बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली. त्यांनी मला हे ही सांगितले होते की, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि इतर त्यांच्या पक्षातील नेत्यांना देखील त्यांनी कल्पना दिली आहे. 

    त्यांच्या इतर नेत्यांची सहमती होती का?

    मी जेव्हा निर्णय देतो तेव्हा तो इम्प्लिमेंट होतो, त्यामुळे तुम्ही त्या विषयी चिंता करू नका. माझे सर्व सहकारी मी सांगेल त्याप्रमाणे निर्णय घेतील. 

    इतक्या घडामोडी होत आहेत, त्याबद्दल काय?

    तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. आम्ही काही भाष्य करू इच्छित नाही. 

    तुमचं नाव आज अर्थमंत्री पदासाठी पुढे येत आहे 

    त्यांचा पक्ष आज तरी स्वतंत्र आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि काही प्रमाणात छगन भुजबळ जी त्यांच्या पक्षाचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्या तिघांचा जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी केली जात असेल. त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल मी बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही.

    याबाबतीत पवार कुटुंबामध्ये तशी चर्चा झालेली दिसत नाही

    दादांचे अंत्यविधी झाल्यावर मी निघून आलो. मी आणि माझे सहकारी सुनेत्रा वहिनींना भेटलो आणि निघून आलो. त्यानंतर मला माहिती नाही. 

    तुमचे त्यांच्या सोबतचे संबंध

    1991 मध्ये ते विधी मंडळात आले. मी ९० साली निवडून गेलो. त्यानंतर विरोधी पक्षात असताना देखील आम्ही सोबत बसायचो. त्यांच्या स्वभावाचे पैलू बारकाईने माहिती आहेत. अनेक असे संवाद आहेत जे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरले असते. पण आता त्या आठवणी आहेत. 

    नियती अशी असू शकते यावर आमचा विश्वास नाही. हा अपघात कसा झाला असाही प्रश्न पडतो. सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दादांचं असं एकाएकी जाणं हे मान्य होत नाही. ही अशी पहिलीच घटना आहे. प्रत्येकाला जायचं आहे. पण असा अपघात होणे हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. ज्या काळात आम्ही एकत्र येण्याची सर्व चर्चा झाली होती, त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर मला फार मोठा धक्का लागला. अस कसं होऊ शकतं? नियती फार क्रूर असते. 

    तपासाकडे लक्ष आहे का?

    मला तेथील गावातील सरपंचांनी सांगितलं की विमानातून फार मोठा आवाज येत होता. तो नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा होता. तांत्रिक बिघाड होता, कसा झाला, त्याला कोण जबाबदार आहे यावर काही अंशी उजेड करू शकतो. 

    कोण पुढे असेल कोण मागे असेल असा खाजगी बैठकीत संवाद झाला होता का?

    मी नेहमी विनोदाने म्हणायचं मी तुमचा चौघांपेक्षा लहान आहे. त्यामुळे तुमचा नंबर पुढे आहे. तुम्हाला नेहमी माझा पाठिंबाच असेल. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. तुम्ही कोणत्याही पदावर जा माझ्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे एकमेकांशी स्पर्धा करणं हा विषय आमच्यात आला नाही.  मर्यादा सोडून आम्ही एकमेकांवर कधी भाष्य केलं नाही. राजकारणात मर्यादा राखण्याचे भान त्यांना सुद्धा होते. 

    त्यांच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री होता आलं असतं, त्यांनी महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे काम केले असते. कामाची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंड होता. प्रशासनावर चांगली पकड होती. त्यामुळे अतिशय चांगलं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात काम केलं असतं. 

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार

    अजित दादांचा फार आग्रह होता की आपण एकत्र होऊया. अंतिम इच्छा पूर्ण करण्याची बुद्धी सर्वांना मिळो. गेल्या सात आठ महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. आमच्या बाजूच्या सर्वांची सहमती आहे. या एकत्रित येण्याला कोणाचा विरोध नाही उलट पाठिंबाच आहे असे अजित दादांचे देखील म्हणणे होते.

    सुनेत्रा ताई आज उप मुख्यमंत्री होतील. त्यानंतर त्यांच्या आमदारांच्या भावना काय आहेत, ते पाहून जर निर्णय घेतला तर अजित दादांचा इच्छा पूर्ण होईल.