जेएनएन, मुंबई. राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा खूप तिव्र झाल्या आहेत. विशेषतः विदर्भात सुर्य आग ओकत आहे. या भागातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. वर्धा आणि अमरावती येथे सर्वाधिक (44.4) तापमानाची नोंद दिसून येत आहे. तर, दुसरीकडे पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
पुढील पाच दिवस हे वातावरण्यात विविध बदल दर्शवत आहेत. विदर्भात उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट आहे.
मुसळधार पावसाचा अलर्ट
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उष्णतेची लाट
अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांत उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हिटवेवची कारण काय?
राज्यावर अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे आकाश स्वच्छ असून सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत आहे. त्यामुळे तापमान झपाट्याने वाढत आहे. 
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना!
- दुपारी बाहेर जाणे टाळा
- भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्या
- डोक्यावर टोपी/स्कार्फ वापरा
- हलके, सुती कपडे परिधान करा
- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केले आहे.
हेही वाचा - Heatwave in Maharashtra: महाराष्ट्रात सुर्य ओकतोय आग! ‘या’ जिल्ह्यातील तापमान पोहोचले 44 अंशांच्या पार
