पुणे.Pune Heat Wave: शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल 770 नागरिकांना उष्णतेशी संबंधित आजारांमुळे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले आहेत.

महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आकडेवारी महापालिकेच्या रुग्णालयांपुरती मर्यादित आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमधील रुग्णसंख्या गृहीत धरल्यास ही संख्या हजाराच्या पुढे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर असल्याची शक्यता आहे.

कोणते आजार वाढले?

तज्ज्ञांच्या मते, वाढत्या उकाड्यामुळे खालील समस्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत:

• उष्माघात (Heatstroke)

• शरीरातील पाण्याची कमतरता (Dehydration)

    • चक्कर येणे, अशक्तपणा

    • त्वचेचे विकार आणि उष्णतेमुळे होणारे इन्फेक्शन आहे. 

    यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आणि बाहेर काम करणारे मजूर यांना याचा अधिक फटका बसत आहे.

    तापमानाचा वाढता पारा!

    एप्रिल महिन्यातच तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

    आरोग्य विभागाचे आवाहन!

    महापालिका आणि आरोग्य विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिले आहेत. यामध्ये 

    • दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे

    • भरपूर पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करावे

    • हलके, सैल कपडे परिधान करावेत

    • डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरावा

    • लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन केले आहे. 

    प्रशासन सतर्क-

    रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी विशेष उपचार व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच जनजागृती मोहिमांवरही भर दिला जात आहे.