पुणे. Pune-Shirdi Railway: पुणे ते शिर्डी दरम्यान थेट रेल्वेसेवा सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण होत आहे. साईभक्तांसाठी आणि नियमित प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणारी पुणे–साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उदयापासून (बुधवार) सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या नव्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

या नव्या सेवेमुळे पुणे आणि साईनगर शिर्डी यांच्यातील प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि थेट होणार आहे. विशेष म्हणजे, ही सेवा ‘इंटरसिटी’ धर्तीवर चालवली जाणार असून दररोज धावणारी ही पहिली थेट रेल्वेसेवा असणार आहे . रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी प्रवाशांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.  

धार्मिक पर्यटनाला चालना-

शिर्डी हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून दरवर्षी लाखो भाविक साई बाबा यांच्या दर्शनासाठी येथे येतात. पुण्यातून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना यापूर्वी बस किंवा इतर रेल्वे मार्गांचा आधार घ्यावा लागत होता. आता थेट रेल्वेसेवा उपलब्ध झाल्याने प्रवासाचा वेळ आणि त्रास दोन्ही कमी होणार आहेत. यामुळे धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

आणखी एक मोठी भेट : हडपसर–दानापूर अमृत भारत एक्सप्रेस

पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची रेल्वेसेवा सुरू होत आहे. हडपसर ते दानापूर (बिहार) दरम्यान नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ रेल्वेसेवेचेही उद्घाटन उद्या होणार आहे. या सेवेच्या माध्यमातून पुणे आणि उत्तर भारतातील प्रवाशांना अधिक चांगली रेल्वे जोडणी मिळणार आहे. हडपसर टर्मिनलमधून सुरू होणाऱ्या या सेवेचा फायदा उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.  

    वेळापत्रकाची प्रतीक्षा

    पुणे–शिर्डी रेल्वेसेवेचे उद्घाटन निश्चित झाले असले तरी रेल्वेकडून संपूर्ण वेळापत्रक, थांबे आणि भाडे याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. प्रवासी आणि साईभक्तांमध्ये या नव्या सेवेबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.