मुंबई. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने महत्त्वाचा राजकीय निर्णय घेत या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सपकाळ यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत एकजूट राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून काँग्रेसने ही भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “मतांचे विभाजन होऊ नये आणि आघाडी मजबूत राहावी, यासाठी आम्ही माघार घेत आहोत,” असेही सपकाळ यांनी नमूद केले.
सपकाळ म्हणाले, बारामती नाही तर देशभरात भाजपच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली होती.परंतु शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भल्या पहाटे येऊन बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली. अजित पवार यांच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घ्या अशी विनंती केली. काही जणांनी अपरिपक्व वक्तव्य केली. त्या संदर्भात कुटुंबांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही विनंती आणि सूचना दिल्या, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
बारामती येथील पोटनिवडणूक आधीपासूनच प्रतिष्ठेची मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेसच्या माघारीमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होत आहे.
या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, बारामतीतील पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
