बारामती. Baramati By Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय स्तरावर मोठे प्रयत्न झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर संपूर्ण चित्र बदलले असून, ही निवडणूक आता बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीत मतदान अटळ ठरले आहे.
या पोटनिवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र अद्यापही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभे आहेत. मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्याने निवडणुकीत बहुकोनी लढत होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवरील संघटनबांधणी, पक्षाचा पाठिंबा आणि कुटुंबीयांचा प्रभाव या सर्व बाबी त्यांच्या बाजूने असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्या आरामात निवडून येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या निवडणुकीत दोन वादग्रस्त उमेदवारही मैदानात असल्याने राजकीय समीकरणात काही प्रमाणात चुरस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे उमेदवार आक्रमक प्रचार करत असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
