पुणे - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या आठवड्यात बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. 6 फेब्रुवारी 2026 दिवशी त्यांच्या निधनाला 10 दिवस होत असल्याने त्यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी व यापुढचे कोणतेही विधी होणार नसल्याची माहिती त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी दिली आहे.
तिसऱ्या दिवशी म्हणजे अस्थी विसर्जना दिवशीच सर्व धार्मिक विधी पार पाडले असल्यामुळे आता आता दहावे आणि तेरावे होणार नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना बारामती विमानतळाजवळ विमान कोसळून अजित पवारांचे बुधवार 28 जानेवारीला निधन झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 30 जानेवारी रोजी अजित पवार यांचा अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. सोनगाव येथील कऱ्हा-नीरेच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंत 6 फेब्रुवारी रोजी अजित पवारांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, हा दशक्रिया विधी तिसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारीला पार पडल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. त्यामुळे आता अजित पवार यांचा कुठलाही विधी होणार नाही, अशी माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली.
मात्र याबाबत सुनेत्रा पवार किंवा जय-पार्थ पवार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. संपूर्ण पवार कुटूंबाशी चर्चा करूनच श्रीनिवास पवारांनी हे माहिती दिल्याचे समजत.
दरम्यान, 31 जानेवारी रोजी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीत परतल्या आहेत. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
