जेएनएन, नाशिक: नाशिकमधील टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. कंपनीने कर्मचारी निदा खान (Nida Khan) यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील अधिकृत ‘Suspension Order’ पत्र समोर आले आहे.
काय आहे पत्रात?
9 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या पत्रानुसार, निदा खान या 27 डिसेंबर 2021 पासून टीसीएसमध्ये ‘प्रोसेस असोसिएट’ पदावर कार्यरत होत्या. मात्र, त्यांच्या विरोधात गंभीर प्रकरण नोंदवले गेले असून त्या सध्या न्यायालयीन/पोलीस संबंधित प्रकरणात असल्याची माहिती कंपनीला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पुढील निर्णय होईपर्यंत निलंबन कायम राहणार.कंपनीच्या नेटवर्क व सिस्टीम्सवरील त्यांचा ऍक्सेस तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - Heatwave in Maharashtra: महाराष्ट्रात सुर्य ओकतोय आग! ‘या’ जिल्ह्यातील तापमान पोहोचले 44 अंशांच्या पार
कंपनीचे निर्देश!
पत्रात पुढे नमूद केल्याप्रमाणे:
- त्यांच्या ताब्यातील सर्व कंपनी मालमत्ता परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
- पुढील आदेश येईपर्यंत कार्यालयात हजर राहू नये किंवा वर्क फ्रॉम होम करू नये
- या प्रकरणाबाबत कोणत्याही सहकाऱ्याशी चर्चा न करण्याचा सक्त आदेश देण्यात आले आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात सहकार्य न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.हे पत्र टीसीएसचे ब्रांच HR हेड शेखर कांबळे (पुणे, नाशिक व गोवा) यांच्या सहीने जारी करण्यात आले आहे.
प्रकरण गंभीर व चर्चेत
निदा खान यांच्यावरील आरोप आणि त्यांचा संभाव्य गुन्हेगारी तपास यामुळे हे प्रकरण सध्या नाशिकसह राज्यभर चर्चेत आले आहे. याआधीही त्यांच्या संदर्भात विविध आरोप आणि तपास सुरू असल्याची माहिती समोर आली होती.
