नाशिक. Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. या प्रकरणात अशोक खरात पोलिस तपासावर दबाव टाकत असल्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार, तपासाची दिशा प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, शिर्डीतील गुन्ह्यात नीरज जाधव याला अटक व्हावी यासाठी अशोक खरात आग्रही असल्याचे समजते. यामुळे तपासावर बाह्य दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे. फिर्यादी तरुणीसोबत खरात थेट व्हॉट्सॲप मेसेजद्वारे संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, फिर्यादी तरुणी आणि पोलिस अधिकाऱ्यांदरम्यान सुरू असलेल्या चौकशीतील गोपनीय माहितीही खरातपर्यंत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणेमधील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली होती. आयोगाने शिर्डी पोलिसांना या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती मागवण्यासाठी पत्र पाठवले होते. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, पोलिस तपासावर खरातकडून दबाव टाकला जातोय का? तपासाची निष्पक्षता धोक्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरी या प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, तपास यंत्रणा पुढील काळात कोणती भूमिका घेते किंवा खरातविरोधातील आरोपांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.