मुंबई/शिर्डी. Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याने तपासाला निर्णायक वळण मिळालं आहे.

लोकांना लुबाडून पैसा जमिनी व मालमत्तांमध्ये गुंतवला -

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अशोक खरात याने कथित ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली अनेक लोकांकडून फसवणूक आणि खंडणीद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा उकळला. हा पैसा विविध जमिनी आणि मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारांपैकी अनेक व्यवहार अधिकृत नोंदणीशिवाय ‘कच्च्या नोंदीं’द्वारे करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

बेनामी व्यवहारांच्या कच्च्या नोंदी आढळल्या -

धाडीत सापडलेल्या कागदपत्रांमध्ये 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेले व्यवहार, हस्तलिखित करार, तसेच नोंद न केलेल्या उत्पन्नाच्या नोंदी आढळून आले आहेत. यामुळे बेनामी मालमत्ता, बनावट व्यवहार आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याचा संशय अधिक बळावला आहे.

तपास यंत्रणा सध्या मालमत्तांची खरेदी-विक्री, निधीचा मूळ स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची साखळी यांचा बारकाईने मागोवा घेत आहेत. यामध्ये संबंधित बँक खात्यांची तपासणी, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) विश्लेषण, आयकर विवरणपत्रांची पडताळणी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे.

    माहितीनुसार, काही मालमत्तांची अधिकृत नोंदणी करण्याच्या तयारीत असतानाच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार लपवण्याचा प्रयत्न फसल्याचे मानले जात आहे.

    दरम्यान, या प्रकरणात आणखी काही सहकारी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवरही कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. तपासाचा विस्तार होत असून, येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.