नागपूर l बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने जोरदार पलटवार केला असून नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नाना पटोले-

नाना पटोले म्हणाले की, बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी सांगितले की, पार्थ पवार यांच्या कुटुंबीयांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. तसेच, “दबाव तंत्र वापरून आणि काँग्रेसवर टीका करून प्रश्न सुटणार नाहीत,” असे स्पष्ट करत पटोले म्हणाले की, पार्थ पवार वयाने लहान असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही.

काँग्रेसच्या ‘डाऊनफॉल’बाबत पार्थ पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पटोले यांनी “कोणाचा डाऊनफॉल होईल हे वेळच ठरवेल,” असे म्हणत उत्तर देणे टाळले.

काँग्रेसचा सोशल मीडियावरून जोरदार पलटवार!

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

    पोस्टमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे की,

    • “धड भाषणही देता न येणाऱ्या आणि कुटुंबीयांच्या जोरावर खासदार झालेल्या व्यक्तीने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं अति आहे.”

    • “वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतरही शांत राहणं आणि चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय करणं योग्य नाही,” असा आरोपही करण्यात आला.

    तसेच, कर्नाटकात या प्रकरणी FIR नोंद झाल्याचा उल्लेख करत, महाराष्ट्रातही गुन्हा नोंदवण्याची मागणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी केल्याचे सांगण्यात आले आहे.