नागपूर. Nagpur winter session 2025 : आठ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात यंदा मोठ्या प्रमाणावर मोर्चे, आंदोलने आणि उपोषणे होणार आहेत. गुरुवार सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 33 मोर्चे विधानभवनावर येण्याची नोंद झाली आहे. याशिवाय वेगवेगळ्या मागण्यांसाठी अनेक संघटनांनी धरणे व उपोषणाच्या परवानग्या मागितल्या आहेत.
संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज!
• 22 संघटनांनी धरणे आंदोलनासाठी परवानगीची मागणी केली आहे.
• 17 संघटनांनी साखळी उपोषणासाठी अर्ज दाखल केले आहेत.
• विशेष म्हणजे, श्रमिकांच्या 13 विविध संघटनांनी मोर्चांसाठी अर्ज केले आहेत.
यंदा सर्वाधिक मोर्चे हे श्रमिकांच्या मागण्यांवर केंद्रित असणार आहे.दरम्यान गुरुवारपर्यंत ही संख्या 33 वर पोहोचली असली, तरी अधिवेशन सुरू होईपर्यंत मोर्च्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये अधिवेशनाचा काळ म्हणजे विविध मागण्यांसाठी नागरिक, कर्मचारी, शेतकरी, कामगार व सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शने होण्याचा काळ असतो. यंदाही त्याला अपवाद राहणार नाही, असे चित्र दिसत आहे.
पहिल्याच दिवशी पाच मोर्च्यांची धडक -
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल पाच मोर्चे विधानभवनावर धडकणार असून, सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. नागपूर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा बंदोबस्त आणि मोर्चांच्या मार्गाविषयी आवश्यक नियोजन सुरू केले आहे.
प्रशासनाची तयारी!
मोर्चांचा वाढता आकडा लक्षात घेता वाहतूक मार्गात अनेक बदल केले आहे. पोलिसाकडून तात्पुरत्या बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान मोर्चांच्या मार्गांचे नियोजन व सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली आहे.पोलीस बंदोबस्त आणि नियोजनसाठी प्रशासन सतत बैठका घेत आहे. नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचे नियोजनही सुरू आहे.
