नागपूर. MLC Election BJP Candidates List: विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात धक्कातंत्र वापरत उमेदवार दिला आहे. भाजपने येथे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांना मैदानात उतरवले आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत. लखानी यांचा मुलगा सारंग लखानी याच्याशी सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचा विवाह ठरला आहे. अरुण लखानी बऱ्याच वर्षापासून भाजपामध्ये सक्रीय असून सध्या ते प्रदेश कार्यकारिणीत सह-कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. कार्पोरेट आणि औद्योगिक क्षेत्रात पक्षाचे संघटना विस्तारण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती यांचा विवाह ठरला असून लवकरच ते लग्नबंधनात अकडणार आहेत. त्यातच अरुण लखानी यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे.स्वतः सुप्रिया सुळे यांनी फोन करून भाजपच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन केल्याचे अरुण लखानी यांनी सांगितले. नुकतेच सुप्रिया सुळे यांनी व्याही अरुण लखानीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मुलीच्या विचाहाचे निमंत्रण दिले होते. यावेळी लखानी कुटुंबातील सदस्य तसेच सारंग यांच्या वाग्दत्त वधू रेवती प्रामुख्याने उपस्थित होते.

 कोण आहेत अरुण लखानी?

  • लखानी हे मूळचे विदर्भातील मलकापूर इथले असून बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब व्यवसायानिमित्त नागपुरात स्थायिक झालं होतं. अरुण लखानी यांची 'विश्वराज इन्फ्रा' ही कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी रस्ते निर्मितीचं काम केलं आहे.
  • लखाणी यांनी "विश्वराज इन्फ्रा" या कंपनीच्या माध्यमातून रस्ते निर्मितीचेही काम केले आहे.
  • नागपूर महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा कामाचे खाजगीकरण करताना फ्रान्सच्या ज्या "वेओलिया" कंपनीला काम मिळाले होते. त्यावेळी वेओलिया कंपनीसोबत भारतीय कंपनी म्हणून अरुण लखाणी यांच्या विश्वराज इन्फ्रा चे सामंजस्य करार होऊन "ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स" (ocw) ही संयुक्त कंपनी स्थापन झाली होती.
  • अरुण लखाणी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राहिले असून इंडियन बॅडमिंटन असोसिएशनमध्येही पदाधिकारी राहिले आहेत.
  • लखानी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात. 
  • अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचा साखरपुडा झाला आहे.