मंबई /नागपूर Maharashtra Local Body Election results 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी, जी मूळतः 2 डिसेंबर रोजी होणार होती, ती आता 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. काही भागातील मतदान 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने, सर्व मतदान पूर्ण झाल्यानंतरच मतमोजणी प्रक्रिया राबवावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

एकत्रित लागणार निकाल -

राज्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रिया न्यायालयात प्रलंबित असल्याने जवळपास २२ नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. प्रचार सुरू असताना व मतदानासाठी केवळ एक दिवस शिल्लक असतानात ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आज मतदान होणार नगरपंचायतींचा व २० डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले.

तोपर्यंत एक्झिट पोलवरही बंदी -

आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले.

    हे व्यवस्थेचे अपयश - फडणवीस

    या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी गेल्या 25  वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहे, परंतु मतदानाच्या एक दिवस आधी मतदान पुढे ढकलले गेलेले निवडणुका मी कधीही पाहिल्या नाहीत. हे व्यवस्थेचे अपयश दर्शवते. भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.