भंडारा - भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. महायुतीकडून या निवडणुकीसाठी अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघातील लाखांदूर नगरपंचायतीचे पाच नगरसेवक भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत.
लाखांदूर नगरपंचायतीतील काँग्रेसचे नगरसेवक मुकेश सहजवानी, निशाताई बगमारे, लोपाताई शिलार, लताताई कुडेगावे आणि प्रमोदभाऊ कुडेगावे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे लाखांदूर नगरपंचायतीतील काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
विधान परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना झालेल्या या पक्षांतरामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी हा प्रवेश लाभदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मानल्या जाणाऱ्या भागात झालेली ही गळती पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. नाना पटोले यांच्या प्रभावक्षेत्रातच काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, भाजपने या प्रवेशाचे स्वागत करताना जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढत असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसकडून या घडामोडीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये या पक्षांतरामुळे नव्याने बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी काळात या घडामोडींचा विधान परिषद निवडणुकीवर कितपत परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
