जेएनएन, नागपूर. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस मध्ये वाद उफाळून आला आहे. पण या वादातून तोडगा लवकरच निघेल आणि चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसेल असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा
पक्षाच्या खासदार यांनी विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांच्यावर टीका केली, याबाबत विचारले असताना वडेट्टीवार म्हणाले, महापालिका निवडणुकीत ज्या नगरसेवकांनी शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून पाठिंबा दिला त्यांची तिकीट कापण्यात आली, निवडणुकीत वाद नको म्हणून दुर्लक्ष केले. विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी मतदारसंघात घेऊन कुणबी आमदार व्हावा म्हणून खासदार यांनी मेळावे घेऊन भाषण केली. त्यामुळे ब्रह्मपुरी मतदारसंघात प्रश्न निर्माण झाले तरी जनतेने या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मतदान केले. या गोष्टी देखील सोडून दिल्या. खासदार आणि आमदार कोणी झाले म्हणजे ते पक्षाचे मालक होत नाही, कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा असतो असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
गेली 25 वर्ष काँग्रेस पक्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यात काम केले. पक्षाच्या अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांबरोबर सगळ्यांनी संघर्ष केला अस असताना नगरसेवकांना जबरदस्ती घेऊन जाणे, सार्वजनिकरित्या विधान करणे याने पक्षाचे नुकसान होते. खासदार यांनी केलेली विधान ही गैरसमजातून केली असावीत असे देखील वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाचे सचिव यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नेत्यांना नाही तर नगरसेवकांनी पक्ष श्रेष्ठींनी चर्चा करावी, त्यांची मत विचारत घेऊन महापौर कोण आणि गटनेता कोण होईल, हा निर्णय घ्यावा, अशी स्पष्टोक्ती विजय वडेट्टीवार यांनी नागपूर मध्ये माध्यमांशी बोलताना दिली.
आज सुप्रीम कोर्टातील ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे ओबीसींचे आरक्षण अडचणीत आले आहे. ओबीसी आरक्षण कमी झाल्यास त्याचे पाप भाजपचे असेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
