मुंबई l शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानांमधून त्यांनी पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करताना भविष्यातील राजकीय पर्याय खुले असल्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

“भविष्यात काय होईल सांगता येत नाही”

भास्कर जाधव यांनी, “भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. नियती जे घडवेल ते मला मान्य असेल,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे ते भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाणार का, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

जाधव यांनी मात्र कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नसला तरी त्यांच्या भाष्यमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

ठाकरेंना घरचा आहेर

यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीवरही भाष्य केले. “टाळी एका हाताने वाजत नाही,” असे म्हणत पक्षातील संवाद आणि कार्यपद्धतीबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. ठाकरेंनी कार्यपद्धतीत काही बदल केले पाहिजेत. पक्ष संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी नेतृत्वाने कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी अधिक संवाद साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.

    आदित्य ठाकरेंनाही सल्ला

    आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी मातोश्रीच्या बाहेर पडले पाहिजे. राज्यभर अधिक व्यापक संपर्क वाढवून जनतेत मिसळण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, “आपल्यापेक्षा हुशार माणसाशी दोस्ती करावी,” असे म्हणत त्यांनी नेतृत्वाने विविध मतांच्या आणि अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याचा स्वीकार करावा, असेही सूचित केले. 

    भास्कर जाधव हे कोकणातील प्रभावी नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना केवळ वैयक्तिक मत म्हणून न पाहता पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या संदर्भातही महत्त्व दिले जात आहे. सध्या त्यांनी पक्ष सोडण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, त्यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि “भविष्यात काय होईल सांगता येत नाही” हे विधान आगामी काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.