नवी दिल्ली. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडले आहे. बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या घाईगडगबडीबाबत विरोधकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीका केली आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनीच नेतृत्व करावे, असा सर्वांचा आग्रह आहे. तसेच, तीन दिवसांचा शोक पाळणे ही पवार कुटुंबाची परंपरा असल्याने चौथ्या दिवशी आम्ही शपथविधी केला.
आम्ही तात्काळ निर्णय घेतला, कारण असा विषय अनेक दिवस प्रलंबित ठेवता येत नाही. दुसरे म्हणजे, पक्षाला स्थिरता आणि दिशा देणे आवश्यक आहे. पक्षाच्या सर्व आमदारांसह कार्यकर्त्यांना असे वाटले की, सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी. अजित पवार अनेक वर्षांपासून पक्षाचे अध्यक्ष आहेत, आणि आता ही जबाबदारी योग्य प्रकारे पुढे नेली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. यासोबतच, आम्हाला पक्षाच्या अध्यक्षांबाबतही निर्णय घ्यायचा होता, आणि आम्ही ती प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मी शरद पवार आणि अजित पवार या दोघांसोबत जवळून काम केले आहे. त्यामुळे, ही माझी जबाबदारी होती. मला माहित आहे की, अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या, काहींनी हा निर्णय घाईघाईने घेतल्याचे म्हटले. पण एखादे कुटुंब किती दिवस विधी किंवा शोक पाळते, हा एक वैयक्तिक विषय आहे. म्हणूनच, अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर, मी स्वतः, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि आमदारांशी बोलल्यानंतर, सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशी स्पष्ट भावना होती. त्यानुसार, त्याच दिवशी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही - पटेल
अजित पवारांनंतर प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा वावड्या उठल्या. त्यानंतर कोणीही दुसरा मराठी नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करा पण प्रफुल पटेल नको असंही काही नेत्यांनी म्हटलं. त्याबाबत प्रश्न विचारल्यावर पटेल म्हणाले की, ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून कधी एक मतही मिळवण्याचा प्रयत्नही केलेला नाही, ते लोक आमच्यासारख्या लोकांबद्दल उलट सुलट बोलतात, ते योग्य आहे का? 1952 पासून माझ्या वडीलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले, मी अनेकदा महाराष्ट्रातील जनतेकडून निवडून गेलो, आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल बोलत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही आधीपासून योग्य निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत, कोणीही राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, पण मी कार्याध्यक्ष आहे. मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही.
VIDEO | At a press conference, NCP leader Praful Patel says, “...We decided immediately because such an issue cannot be kept pending for many days. Secondly, the party needs stability and direction. All the members, including the MLAs, felt that Sunetra ji Pawar should take up… pic.twitter.com/ih2sl1F402
— Press Trust of India (@PTI_News) February 3, 2026
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण होणार का?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरती पटेल म्हणाले, विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी मला काहीच कल्पना दिलेली नाही, त्याबाबत आमची काहीच चर्चा झालेली नाही. विलीनीकरणाबाबत आम्हाला माहीत नाही, मात्र लोक त्यावर चर्चा करत आहेत. स्थानिक स्वराज्यमध्ये दादांनी सांगितलं आपण सर्व वेगवेगळे लढत आहोत. आपली मते विभागली तर फरक पडू शकतो. त्यामुळे शरद पवार गटाशी बोलून समन्वय घडवू असं अजितदादा म्हणाले होते. तेवढीच चर्चा झाली. मी आज जो माझा पक्ष आहे, त्यावरच बोलणार अन्य काल्पनिक गोष्टीवर बोलणार नाही, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. तो विषय आत्ता नाही, पहिला आमचा पक्ष, आमचं घर, आमचा विधिमंडळ नेता हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीचे काही असेल तर त्या विषयावर तेव्हा बघू. आज तो विषय आमच्यापुढे नाही. आमच्याकडे एवढाच विषय आहे पहिले आमचा विधिमंडळाचा निर्णय होईल, उपमुख्यमंत्री पद, त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून मी आमच्या पक्षाचा निर्णय घेणार आहे, ही जबाबदारी माझ्यावर आहे पुढच्या प्रोसेस पूर्ण करायच्या आहेत.
