दिल्ली/मुंबई l राज्यातील  नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी राज्यभरात 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. मात्र काही नगरपालिकांमध्ये तांत्रिक कारणांमुळे आणि न्यायालयीन कार्यवाहीमुळे मतदानाची तारीख 20 डिसेंबर निश्चित करण्यात आली होती. या दोन वेगळ्या मतदान तारखांमुळे मतमोजणी कधी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने २ आणि 20 डिसेंबर या दोन्ही तारखांच्या निवडणुकांची मतमोजणी एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजीच घेण्याचा निर्णय दिला. हाच निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय कायम -

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने खंडपीठाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. दोन्ही मतदान प्रक्रियांच्या परिणामांची एकत्रित घोषणा करणे गरजेचे असून प्रशासनिकदृष्ट्या देखील त्यास हरकत नसल्याचे नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवत म्हटले की, 2 आणि 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानांचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजीच जाहीर केले जातील.

राज्यातील वातावरण तापले-

सर्वोच्च न्यायालयच्या  आदेशामुळे महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका निवडणूक प्रक्रियेतील अनिश्चितता दूर झाली आहे. उमेदवार आणि पक्षांनी आता 21 डिसेंबरच्या मतमोजणीसाठी पूर्ण तयारी सुरू केली आहे. दोन्ही टप्प्यांतील मतदारांची आकडेवारी, मतदानाचा कल आणि प्रचाराचे शेवटचे दिवस यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तांतरावर मोठा प्रभाव पडणार आहे.