जेएनएन, मुंबई/नवी दिल्ली. Maharashtra Political News: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदारांकडून आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 11 वाजता ही भेट होण्याची शक्यता असून, या संदर्भात ठाकरे गटाकडून पुढील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.
माहितीनुसार, ठाकरे गटाचे वरिष्ठ खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. या भेटीदरम्यान पक्षाच्या वतीने एक अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर करण्यात येणार आहे. अरविंद सावंत हे लोकसभेतील गटनेते असल्याने तेच हे पत्र अध्यक्षांकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, या भेटीपूर्वीच दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे बंडखोर खासदार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत विविध राजकीय आणि संसदीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेनंतरच ठाकरे गट लोकसभा अध्यक्षांची नियोजित भेट घेणार की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राज्यासह राष्ट्रीय राजकारणाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून लोकसभा अध्यक्षांना दिल्या जाणाऱ्या पत्रामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जाणार, तसेच अमित शहा यांच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, आगामी संसदीय रणनीती, पक्षीय भूमिका आणि संसदेमधील प्रतिनिधित्वाशी संबंधित विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दिल्लीत होणाऱ्या या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
