जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग येण्यामागे 22 डिसेंबर रोजी पार पडलेली एक महत्त्वाची बैठक निर्णायक ठरल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षात अंतर्गत अडचणी निर्माण होऊ शकतात, अशा नेत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

जयंत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक

या बैठकीसाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी निवडक नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि हर्षवर्धन पाटील हे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. रात्री 9 ते 12 या वेळेत ही महत्त्वाची बैठक पार पडली.

माहितीनुसार, सुरुवातीला सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय दिशा, विलीनीकरणाचे संभाव्य परिणाम आणि पक्षातील एकजूट यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे (वन टू वन) चर्चा केली. या वैयक्तिक चर्चांमध्ये नेत्यांच्या शंका, नाराजी आणि राजकीय भवितव्याबाबतचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, पक्षातील सर्व नेते या विलीनीकरणाच्या प्रक्रियेबाबत समाधानी असल्याचं चित्र दिसत नाही. बैठकीनंतर पक्षातील काही नेते, विशेषतः जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते काहीसे पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याचं दिसून आलं होतं. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, 22 डिसेंबरच्या या बैठकीला विलीनीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानलं जात होता. या बैठकीनंतर घडलेल्या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया वेगाने पुढे सरकली, मात्र त्याचवेळी पक्षातील अस्वस्थता आणि नाराजीही वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.

    आगामी काळात विलीनीकरणाबाबत अधिकृत घोषणा कधी होते, तसेच नाराज नेत्यांची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.