मुंबई/नवी दिल्ली- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना बुधवारी निर्णायक वळण मिळाले. ठाकरे गटातील सहा खासदारांनी नवी दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेत स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याचे पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. या गटाला मान्यता मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, मंगळवार रात्रीपासून ठाकरे गटातील बंडखोर खासदार एकामागोमाग दिल्लीत दाखल होऊ लागले होते. याच काळात एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत पोहोचले होते. त्यानंतर संबंधित खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. बुधवारी सकाळी या सर्व हालचालींना वेग आला आणि स्वतंत्र गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे वृत्त समोर आले.
दरम्यान, या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटातील सहा ते सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. त्याला आता प्रत्यक्ष स्वरूप आल्याचे बोलले जात आहे.
संजय दिना पाटील यांच्या कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त -
या संपूर्ण प्रकरणात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे नावही चर्चेत आहे. ते सध्या दिल्लीत असले तरी मुंबईतील त्यांच्या भांडुप येथील निवासस्थान आणि कार्यालय परिसरात पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. संभाव्य राजकीय तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संजय दिना पाटील यांच्या कार्यालयाबाहेर मशाल चिन्ह पाहायला मिळत आहे. त्यांचे निवासस्थान व कार्यालय एकाच ठिकाणी आहे. संजय दिना पाटील यांची कन्या या देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आहेत.
रविवारी ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित-
रविवारी उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला संजय दीना पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर सकाळी संजय राऊत व अरविंद सावंत यांना आपले नेते म्हणत होते. मात्र दुपारपर्यंत त्यांनी बाजू बदलल्याचे समोर आले आहे.
भांडुप हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असून संजय दिना पाटील यांच्या भूमिकेबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाने या घडामोडींना विरोध दर्शविला आहे. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत कोणत्याही स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली होती. पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही ‘ऑपरेशन टायगर’वर टीका करत पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता.
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, 19 जूनच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठे राजकीय बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात या बंडखोर खासदारांच्या पुढील भूमिकेकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
