मुंबई. Sunetra Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील दोन महत्त्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यांची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. प्रशासनातील सातत्य आणि विकासकामांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सुनेत्रा पवार या दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामे, प्रशासकीय समन्वय, आढावा बैठकांद्वारे योजनांची अंमलबजावणी यावर लक्ष ठेवणार आहेत.

पुणे हा राज्यातील शिक्षण, आयटी, उद्योग आणि सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू मानला जातो, तर बीड जिल्हा कृषी, पाणीटंचाई, आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांमुळे कायम चर्चेत असतो. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असून, त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवे नेतृत्व पुढे येत असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांनी वर्षानुवर्षे सांभाळलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यांची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आल्याने, राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

लवकरच सुनेत्रा पवार पुणे आणि बीड जिल्ह्यांचा दौरा करून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा यंत्रणांसोबत आढावा बैठका घेणार असल्याची माहिती आहे. विकासकामांना गती देणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे त्यांचे प्राधान्य असेल, असे संकेत दिले जात आहेत.

    या नियुक्तीमुळे पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या विकास प्रक्रियेला नवे नेतृत्व मिळाले असून, पुढील काळात त्यांच्या कार्यपद्धतीकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.