मुंबई. india us trade deal News : भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला ऐतिहासिक व्यापार करार हा केवळ आर्थिक करार नसून, तो दोन राष्ट्रांमधील दृढ मैत्रीचे प्रतीक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील दृढ मैत्रीचा विजय असून जागतिक व्यापाराच्या दृष्टीनेही हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या करारामुळे जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय उत्पादक आणि निर्यातदारांना मोठा फायदा होणार असून, भारत–अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय व्यावसायिकांसाठी नवी संधी-
या ऐतिहासिक करारामुळे भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधी उपलब्ध होणार आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना चालना देणारा हा करार परस्पर फायदेशीर ठरणार असून, व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मैत्रीचा एक नवीन अध्याय!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2026
भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.
जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या… https://t.co/cOSEDXoVWp
महाराष्ट्रासाठी विशेष लाभ
महाराष्ट्र हे देशातील निर्यातीत कायमच अग्रेसर असलेले राज्य आहे. या पार्श्वभूमीवर भारत–अमेरिका व्यापार कराराचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या करारामुळे राज्यातील उद्योगधंद्यांसाठी नवे क्षितिज खुले होणार असून, विशेषतः डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अत्याधुनिक, क्रांतिकारी तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना
या गुंतवणुकीमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून, महाराष्ट्र जागतिक तंत्रज्ञान नकाशावर अधिक भक्कमपणे आपले स्थान निर्माण करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारत–अमेरिका व्यापार करार हा महाराष्ट्राच्या औद्योगिक, तांत्रिक आणि आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
