जेएनएन, मुंबई. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठी राजकीय खेळी होण्याची चर्चा सुरू असतानाच, मनसे भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. या चर्चांना आता खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
एमआयजी क्लबमधील मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं की, “मी सांगतोय ना, भाजपसोबत जाणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
राज ठाकरेंनी मनसेची दिशा आणि भूमिका केली स्पष्ट
महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपकडून विरोधकांची मतं फोडण्याचा किंवा वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. विशेषतः मनसे भाजपला पाठिंबा देणार, अशा अफवा राजकीय वर्तुळात पसरले होते. मात्र, राज ठाकरेंच्या या स्पष्ट भूमिकेमुळे मनसेची दिशा आणि भूमिका पूर्णपणे स्पष्ट झाली आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मनसेचा निर्णय हा पक्षाच्या धोरणांवर आणि स्वाभिमानावर आधारित आहे. कोणत्याही दबावाला किंवा राजकीय फायद्याच्या समीकरणांना बळी न पडता, मनसे स्वतंत्र भूमिका घेत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.
दरम्यान, महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असताना, राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय गणितांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मनसे भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याने महापौर निवडणुकीतील समीकरणे आणखी बदलणार आहे.
