जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मोठी घडामोड समोर आली असून, सुनेत्रा पवार यांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी प्रदेश कमिटीला अधिकृत विनंती पत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे पत्र पक्षाच्या तब्बल 30 वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने देण्यात आले असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले आहे.
सुनेत्रा पवार या सक्षम, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक नेत्या
या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वगुणांचा, संघटन कौशल्याचा आणि पक्षाला एकसंघ ठेवण्याच्या भूमिकेचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीमध्ये सुनेत्रा पवार या सक्षम, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक नेत्या ठरू शकतात, असा ठाम विश्वास पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शांत, संयमी पण ठाम नेतृत्वामुळे…
पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही वर्षांत पक्षसंघटन, कार्यकर्त्यांशी संवाद, तसेच महिला, युवक आणि विविध सामाजिक घटकांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. शांत, संयमी पण ठाम नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
अध्यक्षपदाबाबतच्या निर्णयला आता वेग घेण्याची शक्यता
या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली असून, राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा निर्णय आता वेग घेण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी हे पत्र वरिष्ठ नेत्यांकडे आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, या विषयावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी सुनेत्रा पवार यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढे येणे ही राष्ट्रवादीतील मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
