नाशिक. TCS Nashik sexual assault case: टीसीएस नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळाले असून, फरार असलेल्या आरोपी कर्मचाऱ्याला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील आणखी एका व्यक्तीचा पाचवा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने फरार टीसीएस कर्मचाऱ्याला राहण्यासाठी आपले घर भाड्याने दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी सांगितले की, “फरार टीसीएस कर्मचाऱ्याला आश्रय दिल्याच्या आरोपावरून संबंधित व्यक्तीचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत न्यायालयालाही औपचारिक माहिती दिली जाणार आहे.”
नऊ गुन्ह्यांचा एसआयटीकडून तपास
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात 26 मार्च रोजी दाखल झालेला हा गुन्हा टीसीएस नाशिकशी संबंधित लैंगिक अत्याचार, छळवणूक आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांशी निगडित नऊ गुन्ह्यांपैकी एक आहे. या सर्व प्रकरणांचा तपास एसआयटीकडून सुरू आहे.
या प्रकरणात एसआयटीने 22 मे रोजी नाशिक रोड सत्र न्यायालयात चार आरोपींविरुद्ध सुमारे 1,500 पानी दोषारोपपत्र दाखल केले होते.
गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल
सुरुवातीला तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 69 (फसवणूक किंवा विवाहाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध), कलम 75 (लैंगिक छळ), कलम 299 (धार्मिक भावना दुखावणारी कृत्ये) आणि कलम 3(5) (सामूहिक हेतू) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही तरतुदी लागू करण्यात आले आहेत.
संभाजीनगरातून ताब्यात
प्रकरणातील महिला आरोपी एफआयआर नोंद झाल्यापासून फरार होती. पोलिसांनी 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एका घरातून तिला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान तिला राहण्याची व्यवस्था करून दिल्याच्या आरोपावरून एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतीन पटेल आणि नव्या आरोपीची संयुक्त चौकशी
पोलिसांनी सोमवारी मतीन पटेल आणि नव्याने आरोपी करण्यात आलेल्या व्यक्तीची संयुक्त चौकशी केली. फरार कर्मचाऱ्याशी त्यांचे संबंध आणि आश्रय देण्यामागील भूमिका याबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी मतीन पटेल यांचा मोबाईल फोन जप्त केला असून, फॉरेन्सिक तपासासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने (व्हॉईस सॅम्पल) घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मतीन पटेल यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी सांगितले की, “फॉरेन्सिक विश्लेषणासाठी आवाजाचे नमुने देण्यासंदर्भात नगरसेवक मतीन पटेल यांना गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
दरम्यान, या बहुचर्चित प्रकरणातील तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, आरोपींना मदत करणाऱ्या किंवा आश्रय देणाऱ्या इतर व्यक्तींची भूमिकाही एसआयटीकडून तपासली जात आहे.
